न्यायहक्कासाठी हजारो रिक्षाचालक रस्त्यावर उतरणार!

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 30 नोव्हेंबर रोजी ‘रास्ता रोको`
विरार : पालघर जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको` आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक-मालक महासंघ व त्याच्याशी संलग्न पालघर जिल्ह्यातील चाळीस रिक्षा संघटनांच्या नेतृत्वात 30 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता हे उग्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक-मालक महासंघाचे अध्यक्ष महेश अंबाजी कदम यांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील हजारो रिक्षा चालकांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत सरकार उदासीन आहे. गुजरात गॅस कंपनी नियमित आणि मुबलक गॅस पुरवठा करण्यास सक्षम नाही. परिणामी रिक्षा चालकांचे आर्थिक नुसार झालेले आहे. त्यामुळे गुजरात गॅस कंपनीचा करार रद्द करण्यात यावा व महानगर गॅसचा पुरवठा करण्यात यावा, अशी रिक्षा चालकांची मागणी आहे. याशिवाय नवीन रिक्षा नोंदणीकरता लागणारे इरादा पत्र वसई येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून देणे बंद करण्यात यावे. रिक्षाचालकांचे कुटुंबीय व ज्येष्ठ रिक्षाचालकांना पेन्शनकरता कल्याणकारी महामंडळ घोषित करण्यात यावे, कोविड संक्रमण काळात शासन आदेशानुसार रिक्षा/टॅक्सी/डम-डम बंद ठेवण्यात होत्या. त्यामुळे या वाहनांची वयोमर्यादा तीन वर्षांनी वाढवून देण्यात यावी, वसई, नालासोपारा, विरार परिसरातील शासनाने अधिकृत केलेले 145 रिक्षा थांबे अस्तित्वात यावेत, अनधिकृत रिक्षा, खासगी बस, बेकायदा प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी, सुधारित मोटार वाहन कायद्या-2019 नुसार वाहतूक शाखा आणि आरटीओकडून आकारण्यात आलेली दंड रक्कम 50 टक्क्यांनी कमी करण्यात यावी, वसई-विरार शहरातील ओला-उबेर यांचे अनधिकृत थांबे हटविण्यात यावेत इत्यादी मागण्या रिक्षाचालकांच्या आहेत.
या मागण्यांच्या अनुषंगाने ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक-मालक महासंघ व त्याच्याशी संलग्न पालघर जिल्ह्यातील चाळीस रिक्षा संघटनांनी जिल्हाधिकारी, परिवहन विभाग, वाहतूक विभाग, तहसीलदार, वसई-विरार महानगरपालिका या संबंधित प्रशासनांकडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. परंतु या मागण्यांबाबत कोणतीही पावले उचलली जात नसल्याने हा रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ऑटोरिक्षा, टॅक्सी चालक-मालक महासंघ अध्यक्ष महेश अंबाजी कदम यांनी सांगितले.
दरम्यान, आपल्या न्यायहक्कासाठी वसई-विरारसह पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षाचालक, मालक व त्यांच्या कुटुंबीयांना या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महासंघाच्या पदा धिकारी यांनी केले आहे.