खाजगी वाहनांवर शासकीय खात्यांच्या पाटया लावून फिरणाऱ्या पर्यटकावर कारवाई करण्यात यावी….!

खाजगी वाहनांवर शासकीय खात्यांच्या पाटया लावून फिरणाऱ्या पर्यटकावर कारवाई करण्यात यावी….!

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची मागणी

सिंधुदुर्ग-

खाजगी वाहनांवर शासकीय खात्यांच्या पाटया लावून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन करणाऱ्या पर्यटकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व संघटनेचे जिल्हा सचिव अर्जुन परब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आणि गजबजलेला जिल्हा आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुध्दा वाढत आहे. परंतु काही पर्यटक आपण मोठे कोणीतरी अधिकारी असल्याप्रमाणे आपल्या गाडीवर पोलीस, न्यायाधीश, भारत सरकार, महाराष्ट्र शासन अशा नावांच्या पाट्या लावून राजरोसपणे फिरतात व स्थानिकांना धमक्या देतात. त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होत आहे. अशा प्रकारे पाट्या लावणे कायद्याने मनाई असतांना अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून सर्रासपणे भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस ते अगदी न्यायाधीश अशा पाट्या खाजगी वाहनांच्या दर्शनी भागात लावलेल्या दिसून येतात. विशेष परिवारासह सिंधुदुर्ग जिल्हयात पर्यटनासाठी आलेल्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील पर्यटन दृष्टीने महत्वाच्या अशा ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली असतांना या बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांची दादागिरी सुरू असल्याचे चित्र दिसून येते. अशा पाट्या लावून गुन्हेगार याचा गैरफायदा घेऊ शकतात. वाहतुक पोलीस किंवा आर.टी.ओ. यांनी अशा बेकायदेशीर पाटया लावणाऱ्यांवरती कडक कारवाई करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तसेच मालवण व देवगड परिसरात सुटीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. परिणामी दर शनिवार व रविवारी दोन्ही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात व तासनतास पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडतात. अशा वेळी सरकारी नावांच्या वरील पाटया लावलेल्या खाजगी वाहन धारकांकडून रस्त्यामध्ये वाहने बेजबाबदारपणे चालवून वाहतूकीला अडथळा केला जातो, तसेच जोरात हॉर्न वाजविणे, विरुध्द दिशेने वाहने चालविणे असे प्रकार दिसून येतात. सर्वसामान्यांना वाहतूक नियम दाखवून दंड वसूल करणारे वाहतूक पोलीस अशा बेकायदेशीर पाटया लावणाऱ्या वाहनचालकांवर मात्र कोणतीही कारवाई करतांना दिसत नाहीत. तरी संबंधित गाडयांची तपासणी करून मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणी बाबतचे लेखी निवेदन ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांना निवेदन देते वेळी मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सचिव अर्जुन परब, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, मालवण तालुका सहसचिव महेश मयेकर उपस्थित होते. या लेखी निवेदनाची प्रत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्गनगरी-ओरोस तसेच पोलीस निरीक्षक, देवगड यांना माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *