
वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात संत गाडगे महाराज जयंती
सांगली/तासगाव : महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे.संत गाडगेबाबा समाजाची काळजी वाहणारे संत होते तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले संत गाडगेबाबांनी आपले सर्व आयुष्य समाजासाठी घालवले.गाडगेबाबा प्रापंचिक जीवनातून विरक्त होऊन पारमार्थिक मार्गाकडे वळलेले संतपुरुष होते. स्वतःच्या संसारापेक्षा सर्व समाजाच्या संसाराची काळजी वाहणारे ते खरेखुरे संत होते.आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य यांची शिकवण गाडगेबाबा देत.आपल्या समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा इत्यादी दोषांवर कोरडे ओढून ते दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ते खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते. बहुजन समाजातील भोळ्याभाबड्या जनतेला शहाणे करून तिला योग्य मार्ग दाखविण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ.साईनाथ घोगरे यांनी केले तर आभार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक प्रा.आण्णासाहेब बागल यांनी मानले.कार्यक्रमाला महेश चव्हाण, वासू कोळी, यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग,विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.