
सांगली/तासगाव : आषाढी एकादशी निम्मित गुरुवार पेठेतील कुंभार बांधवांच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त उपस्थित होते. या मंदिरात वर्षानुवर्ष एकादशी,गोकुळ अष्टमीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रविवारी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल भक्त राजूभाऊ माने पाटील( विष्णू गल्ली) यांनी मंदिरात भव्य-दिव्य आकर्षक सजावट केली तर पुजारी सोमनाथ कुंभार यांच्या हस्ते अभिषेक,महापूजा व महाआरती भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. शुभम थोरबोले (सूर्यवंशी गल्ली)या भक्ताने यावेळी केळी,तर गोपाल प्रिंटिंग प्रेसचे प्रकाश थोरात, श्रीमती सुमन भीमराव खंडागळे, श्रीमती पाटील(सूर्यवंशी गल्ली )यांनी राजीगिरा लाडूंचे प्रसाद म्हणून वाटप केले. रात्री 9.30 वा. संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ वरचे गल्ली यांचे एकतारी भजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना किराणा व्यापारी अरविंद महाजन यांच्या वतीने मसाले दुध वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नेटके नियोजन कुंभार बांधवानी केले होते. मंदिरात दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.