तासगावच्या रामदेव ट्रस्टचा 191 वा ‘श्री रामोत्सव’ उत्साहात

आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
श्रीरामांच्या जयघोषात दुमदुमली तासगाव नगरी
सांगली/ तासगाव : सियावर रामचंद्र की जय…. प्रभू श्रीरामचंद्र की जय…. अशा जयघोषात तासगाव शहरातील श्री रामदेव ट्रस्ट तासगाव यांच्या वतीने आयोजित 191 वा ‘श्री रामोत्सव’ उत्साहात संपन्न झाला असून चैत्र शुक्ल नवमी, रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी श्रीरामांचा रामनवमी उत्सवासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावली होती.
पहाटेपासून नित्य कार्यक्रम पार पडले. सकाळी 10 वाजता जन्मकाळाच्या कीर्तनात सुरुवात झाली. नियोजित वेळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्रीरामांचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. ह.भ.प. हर्षद बुवा जोगळेकर, पुणे यांचे जन्म काळाचे कीर्तन पार पडले. प्रभू श्रीरामांच्या जयघोषणात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी न्हाणे, श्रीरामांचे बारसे, पाळणा आदी कार्यक्रम झाले.
यावेळी 191 व्या उत्सवास सहकार्य करणाऱ्या हार्मोनियम, तबला, श्रीरामाचे पुजारी, मंदिराची नित्य स्वच्छता करणारे स्वयंसेवक, उत्सवातील स्पीकर व्यवस्था पाहणारे, तसेच तासगाव नगरपरिषद, महावितरण, पोलीस प्रशासन आदींनी चोख कर्तव्य बजावल्या बद्दल त्यांचा सत्कार व आभार मानण्यात आले.
सोमवार दिनांक 7 रोजी महाप्रसाद तर मंगळवार दिनांक 11 रोजी सायंकाळी 6 वाजता वसंत पूजा, रात्री 9 वाजता ‘ स्वराभिषेक’ हा भक्ती गीत गायन कार्यक्रम, बुधवार दिनांक 9 रोजी सायंकाळी 6 वाजता लळीत व गोपाळकाला कीर्तन संपन्न होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.