
वराडकर हायस्कूल कट्टाच्या श्रेया चांदरकर ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती
सिंधुदुर्ग-विवेक परब कापडाच्या तुकड्यावर काढलेले चित्र म्हणजे पट्टचित्र. ओरिसा राज्यातील पारंपरिक चित्रशैली म्हणजे पट्टचित्र. ही चित्रशैली श्री जगन्नाथ पुरीच्या मंदिर परंपरांशी जोडलेली आहे. अति प्राचीन असलेल्या या कला प्रकाराची जपणूक आजही इथले कलाकार करीत आहेत. याची सुरुवात बाराव्या शतकात झाली असे मानले जाते. भगवान जगन्नाथ, विष्णूचे अवतार, रामायण, हे पट्टचित्र संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच प्रेरणास्थान होते. पट्टचित्र मुख्यतः पौराणिक कथा, धार्मिक दंतकथा आणि लोककथा यांच्याशी संबंधित आहे. भगवान जगन्नाथ आणि राधा-कृष्ण, मंदिरातील क्रियाकलाप, जयदेवच्या "गीता गोविंदा, रामायण आणि महाभारतावर आधारित विष्णूचे दहा अवतार हे पट्टचित्राचे प्रमुख विषय आहेत. चित्रकार पारंपरिक पद्धतीने पट्टचित्र कॅनव्हास तयार करतात. नैसर्गिक रंगांचा वापर,आकर्षक रंग संगती, अलंकारिक नक्षीकाम आणि मनुष्याकृती रेखाटण्याची पारंपारिक पद्धत,आकर्षक सजावट या चित्रशैलीची वैशिष्ट्य आहेत. याच चित्रशैलीचे अनुकरण करत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता नववी मध्ये शिकणारी श्रेया समीर चांदरकर हिने रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाचे पट्ट चित्रशैलीत भव्य आकारातील चित्र रेखाटले .५फूट लांबी व ३ फूट रुंदी असलेले हे चित्र रेखाटण्यासाठी तिला पाच दिवसांचा कालावधी लागला. या चित्रात राम लल्लांचे मोहक रूप, सुंदर अलंकरण, आकर्षक रंग संगती पाहून साक्षात अयोध्येतील राम लल्लांच्या दर्शनाचे अनुभूती मिळते. कलाकृती पाहणारे थक्क होऊन जातात.
यापूर्वी श्रेया चांदरकर हिने दोऱ्यांपासून तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीला जगभरातून कौतुकाची थाप मिळाली, तिने बनवलेल्या राम लल्लांच्या पट्टचित्राचे विविध माध्यमातून कौतुक होत आहे.