नवीन उद्योजकांना भरारी घेण्यासाठी ऊर्जा मिळेल : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

स्विफ्ट अँड लिफ्ट तर्फे ‘कोल्हापूर उद्योग पुरस्कार 2024’ संपन्न
विविध क्षेत्रातील 63 महिला व पुरुष उद्योजकांचा सन्मान
कोल्हापूर : समाजात आधुनिक बदल व नवीन शोध लागत आहेत तसेच नवीन लोक उद्योग क्षेत्राकडे वळत असताना या क्षेत्रात भरारी घेणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप या पुरस्काराने मिळाली असून उद्योजकांना आपापल्या क्षेत्रात नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. कोल्हापूर येथील निलेश साबे यांच्या शिफ्ट अँड लिफ्ट संस्थेमार्फत ‘ कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कार 2024 ‘ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. हॉटेल फर्न येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर,सांगली, हातकणंगले, इचलकरंजी सह इतर शहरांमधील उद्योजकांचा सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी अस्मिथा मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीच्या स्मिता पाटील यांच्यासह 63 जणांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्काराबाबत बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या, हा पुरस्कार केवळ उद्योजकांचा नसून उद्योग व्यवसायांमध्ये पाऊल टाकणाऱ्या समस्त महिलांचा सन्मान यानिमित्ताने होत आहे. पुरस्कार प्राप्त महिलांच्या पंखांना बळ मिळाले असून महिलांच्या कामाची दखल घेतल्याबद्दल संयोजकांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त उद्योजकांचे कुटुंबीय, कोल्हापूर शहरातील मान्यवर, स्विफ्ट अँड लिफ्ट संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.