
यंदा शेतकऱ्यांचे वाचणार 10 लाख 57 हजार458
ज्यादा वाटप झालेले अनुदान होणार वसूल !
तासगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती कडून होणाऱ्या बेकायदेशीर सानुग्रह अनुदान वाटपास यंदा लगाम बसला असून सन 2024-25 सालात होणाऱ्या सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) वाटपामध्ये शेतकऱ्यांचे 10 लाख 57 हजार 458 इतके रुपये वाचले जाणार आहेत. सत्ताधारी संचालकांच्या कारभारावर विरोधी संचालकांनी घेतलेल्या भूमिकेला यश आले आहे. गेले वीस वर्ष सुरू असलेल्या सानुग्रह अनुदान वाटप पद्धतीस लगाम बसला आहे. त्याचबरोबर ज्यादा वाटप झालेले अनुदान वसूल करण्यात यावे असे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेवनाना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान वाटप होते. हे अनुदान नियमापेक्षा जास्त वाटप केले जात आहे. याबाबत विरोधी संचालकांनी वाटप पद्धतीस विरोध केला. नियमानुसार 8.33 टक्के इतके अनुदान कर्मचाऱ्यांना देता येत असताना 20 टक्के प्रमाणे हे अनुदान वाटप होत होते. हा प्रकार गेली वीस वर्षे सुरू होता. 2020-21 चे लेखापरीक्षण सुरू असताना आम्ही हरकत घेतली. त्यामुळे 20 -21 आर्थिक वर्षातील प्रशासकीय विशेष अहवालामध्ये ज्यादा अनुदान वाटप झाल्याचे आढळून आले. ज्यादा वाटप झालेले 11.67% सानुग्रह अनुदान वसूल करावे असे या अहवालात म्हटले आहे.
मागील तीन आर्थिक वर्षात वाटप करण्यात आलेल्या अनुदानाची (20% प्रमाणे) रक्कम 44 लाख 91 हजार 879 रुपये इतकी होते. परिपत्रकाप्रमाणे (8.33 % प्रमाणे) ही रक्कम 18 लाख 70 हजार 867 रुपये इतकी वाटप होणे गरजेचे होते. परंतु 26 लाख 21 हजार 011 रुपयांचे ज्यादा वाटप करून आर्थिक घोटाळा करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना 20 टक्के रक्कम वाटप करून त्यातील 10 टक्के रक्कम त्यांच्याकडून परत घेतली जात होती. यामधील काही रक्कम संचालकांना आणि मोठी रक्कम राष्ट्रवादीच्या चुलत्या -पुतण्याने घशात घातली. शेतकऱ्याच्या पैशावर स्वतः दिवाळी साजरी केली. असा आरोप नाव न घेता रोहित पाटील आणि सुरेश पाटील यांच्यावर केला.
आता सन 2024- 25 या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांना 8.33% सानुग्रह अनुदान वाटप व्हावे, असा ठराव पारित करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे 10 लाख 57 हजार 458 इतके वाचणार आहेत. विरोधी संचालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे व डी डी आर कडे केलेल्या तक्रारीला यश मिळाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारे असे इतर गैरव्यवहार येत्या काळात जनतेपुढे उघड करणार असल्याचे महादेवनाना पाटील यांनी सांगितले.