यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण जयंती साजरी
सांगली/तासगाव : यशवंतराव चव्हाण हे विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. पुढे ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्रीही झाले आणि पुढे त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आहेत असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी केले . पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे अभ्यासू राजकारणी, लोकसेवक, स्वातंत्र्यवीर आणि त्यासोबतच एक प्रभावी लेखक म्हणूनही उभ्या महाराष्ट्राला परिचीत आहेत. अशा यशवंतराव चव्हाण यांचे विचार आजही राजकारणी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देतात. ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीदवाक्याने मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे काम सुरू असून शिक्षणापासून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम हे विद्यापीठ करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केंद्रसंयोजक प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले तर आभार केंद्रसंयोजक डॉ.के.एन. पाटील यांनी मानले कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव,कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ.एस.आर.घोगरे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे समंत्रक,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.