बालवाडी सेविकांचे आम. रोहित पाटील यांना निवेदन

बालवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत करा
2008 पासून रखडलेल्या नेमणुका सुरू होण्यासाठी पाठपुरावा करा : केली मागणी
सांगली/ तासगाव : तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या बालवाडी सेविका यांची अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक व्हावी यासाठी तासगाव येथील बालवाडी सेविका यांनी आम. रोहित पाटील यांना निवेदन दिले आहे.
निवेदन देताना बालवाडी सेविका म्हणाल्या, दरवर्षी तीन बालवाडी सेविकांचे अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक करण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे 2008 पूर्वी 3 महिलांची नेमणूक झाली देखील. पण 2008 नंतर ही प्रक्रिया रखडली गेली. ही बाब तत्कालीन मंत्री आर आर आबा पाटील यांना भेटून सांगितली होती. परंतु अद्याप आमची मागणी शासनाकडून मान्य झाली नाही. या नेमणुकीच्या प्रतीक्षेमध्ये सध्या 30 हून अधिक बालवाडी सेविका आहेत. महिना केवळ 300 रुपये मानधनावर या महिला राबत होत्या. तुटकुंजा मानधनावर काम करणाऱ्या महिलांना किमान अंगणवाडी सेविका म्हणून शासनाने समाविष्ट करून घ्यावे. याबाबत आपण जातीने लक्ष घालून आमच्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न करावेत असा आग्रह आम. रोहित पाटील यांना धरण्यात आला.
यावेळी बालवाडी सेविकांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन आमदार रोहित पाटील यांनी दिले.