
सांगली/तासगाव : जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतका दूरदृष्टीचा व नवसृष्टी निर्मितीची रुजवण करणारा लोककल्याणकारी राजा झाला नाही. हा राजा कुण्या एका जातीचा किंवा धर्माचा नव्हता, तर प्रजाहित दक्ष मानव कल्याणकारी राजा होता. त्यांच्या ध्येय धोरणाची संस्कार मूल्यांची रुझवन शिवसप्ताहातून युवा पिढीत व्हावी असे प्रतिपादन प्रा. जी. के. पाटील यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या शिवसप्ताहाचे उद्घाटन व ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे होते.
प्रा.पाटील म्हणाले, जिजाऊंनी स्वघरात वडिलांची व भावंडांची झालेली हत्या पाहून भाळी रक्ताचा टिळा लावीत हिंदवी स्वराज्य उभा करणारा पुत्र जन्माला घालीन अशी शपथ घेतली. १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरीवर छत्रपतींचा जन्म झाला. बंगलोरहून शहाजीराजांनी जिजाऊ व शिवाजीराजांना पुणे प्रांती पाठवून वयाच्या सातव्या वर्षी शिक्षणाची व्यवस्था केली. जिजाऊंनी अध्यात्म आणि लष्करी शिक्षणातून छत्रपतींना घडवले. वयाच्या नव्या वर्षी मित्रांसोबत युद्ध लढायांचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या बाराव्या वर्षी शहाजी राजांनी तयार केलेली शिवमुद्रा स्वीकारली आणि युद्ध मोहिमेवर जाताना हर हर महादेवाच्या घोषणांनी आसमंत दरवळला. शत्रूंचे प्रचंड सैन्य हरवण्यासाठी त्यांना पराभूत करण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजांचे गनिमी कावा तंत्र वापरले. स्वराज्यात ३६० किल्ले समाविष्ट केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे म्हणाले छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून यवनांच्या अन्याय प्रवृत्ती विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. आणि कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. जगभराला अभिमान वाटावा असे स्वराज्य उभारले. त्यांचे प्रशासन आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणारे ठरले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. पल्लवी आर. मिरजकर यांनी केले तर सूत्रसंचालन कु. प्रेरणा पवार व आभार कु. मधुरा यादव हिने मानले. कु.सुविधा खुडे हिने शिवगर्जना केली. कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य जे.ए.यादव, डॉ.अमोल सोनवले, प्रा.प्रकाश खाडे, कॅप्टन डॉ.विनोदकुमार कुंभार, प्रा.आण्णासाहेब बागल प्रा. रणजीत कुंभार, डॉ. अर्जुन वाघ, डॉ. एन. डी नाईक यांसह इतर गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.