हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने रोहित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुती आणि विरोधकांचा रोहित पवाराकडून खरपूस समाचार

निष्ठावंत कार्यकर्त्याने अर्ज भरला असल्याची चर्चा

सांगली/ तासगाव : राष्ट्रवादीचे (श.प.गट) युवा नेते रोहित पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडी मधील नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी महायुती सरकार आणि रोहित पाटील यांच्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. तर शरद पवारांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याचे समाधान उपस्थितातून बोलले जात होते.
मार्केट यार्ड तासगाव येथून ११वा.५० मि .वा मिनिटांनी पदयात्रेस सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, खासदार विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय आर. आर. पाटील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही पदयात्रा औद्योगिक वसाहत तासगाव येथे पोहोचली. या ठिकाणी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, आपल्या उपस्थितीत रोहित यांचा अर्ज भरला आहे. रोहित पाटील यांना निवडून द्यायची जबाबदारी आपल्या उपस्थितांवर आहे. एक महिन्यात आपला कारखाना सुरू करून दाखवायचा आहे. असे आश्वासन सुमनताईंना देतो. घड्याळामध्ये आता बारा वाजले आहेत. हे या निवडणुकीतून आता दाखवून द्यायचे आहे. रोहित यांना 1 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून द्याल, हे आपली उपस्थितीच सांगत आहे. आबांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी होते. आबांनी धाडसी निर्णय घेतले. सावकारी, डान्सबार सारखे निर्णय घेत असताना आबांना अंडरवर्ल्डच्या धमक्या आल्या पण त्यांनी त्या धमक्यांना भीक घातली नाही. आताचे गृहमंत्री धृतराष्ट्र आहेत. त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. राज्यात दडपशाही, गुंडगिरी वाढली, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार वाढले हे गृहमंत्र्यांना दिसत नाही. आपल्या मतदारसंघातही लोकांना धमक्या देणारे फोन येत आहेत त्याला भीक घालू नका. रोहित हे प्रेमळ व कष्टाळू माणूस आहेत. महाराष्ट्र पिंजून काढताना आम्ही 32 दिवस एकत्र होतो. यावेळी राज्यातील विविध प्रश्न आम्ही हाताळले. आपल्या मतदारसंघात ताबा घेणारी गॅंग निर्माण झाली आहे. त्यांची ही वृत्ती हाणून पाडायची आहे. त्यासाठी रोहित यांना निवडून द्या. ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. आबांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही सदैव उभे आहोत. असे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना रोहितदादा पाटील म्हणाले, माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आज झाली आहे. वसंतरावदादा पाटील, जी डी बापू लाड, शेंडगे बापू, अण्णासाहेब सगरे, गणपतराव कोळी, दिनकर आबा यांना अभिवादन करतो. आबा गेले हे तुमच्या मध्ये राहून वाटलं नाही ल. आपल्या मुलाप्रमाणे मला आपण सगळ्यांनी प्रेम दिल. पुढील काळात शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचाराची प्रतारणा होऊ देणार नाही. तुमच्या सर्वांची मान खाली जाऊ देणार नाही असे आश्वासन देतो. या आधी महाराष्ट्रभर फिरत असताना खूप भाषणे केली परंतु स्वतःच्या उमेदवारीसाठी काय बोलावं सुचत नाही. आर.आर. आबा यांनी आणि घरातून मला कृतज्ञतेची शिकवण दिली. माझ्या कार्यकर्त्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.
ते पुढे म्हणाले, शेतकरी अडचणीत असताना ज्यांनी शेतकऱ्यांना बागा काढायचा सल्ला दिला त्यांना मतदारसंघातून बाहेर काढू. पाण्यासाठी आम्ही सांगलीमध्ये उपोषण केलं. आमदारांना उपोषण करण्याची वेळ का आली याबाबत पवार साहेबांनी मध्यस्थी करून जलसंपदा विभागाशी बोलणी केली. दीड दिवसाच्या उपोषणानंतर दीड टीएमसी पाणी मतदार संघासाठी मिळवण्यात यश आले. मात्र याचे श्रेय लाटण्याचा घाट घातला गेला. मला काम करायची संधी दिली तर सिंचन योजना चालवून दाखवेन, मतदार संघात एमआयडीसी उभी करून दाखवेन, द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी विधानसभा मांडता येतील. असे ते म्हणाले. तासगावच्या रिंग रोड संदर्भात 17 वेळा गडकरींना भेटून आलो. प्रवासाची तिकीट जपून ठेवली आहेत. ते ज्या गावात राहतात त्या गावाला वळचण आबांनी केली. त्यांनी रोज आबांच नाव घेतलं पाहिजे. त्यांनी केलेली 15 वर्षातील कामे खुल्या व्यासपीठावर मांडावीत मी 5 वर्षात केलेली कामे व्यासपीठावर मांडतो. असे आव्हान नाव न घेता संजयकाका पाटील यांना केले.
दिनकर आबांचा फोटो ठरला लक्षवेधी — विचारांचा वारसा पुढे नेत असताना रोहित पाटील यांच्या मंचावर डिजिटल मध्ये दिवंगत राजकीय नेत्यांच्या फोटोमध्ये दिसणारा कै. दिनकर आबा पाटील यांचा फोटो लक्षवेधी ठरला. विचारधारेतून बाजूला न जाता सर्वांचा सन्मान ठेवत राजकीय प्रवास करायचा मानस रोहित पाटील यांचा दिसून आला.

About The Author

निशाकांत शर्मा (सहसंपादक)

यह खबर /लेख मेरे ( निशाकांत शर्मा ) द्वारा प्रकाशित किया गया है इस खबर के सम्बंधित किसी भी वाद - विवाद के लिए में खुद जिम्मेदार होंगा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अपडेट खबर के लिए इनेबल करें OK No thanks