
वैकुंठवासी ह. भ. प. बालाजी विष्णूशेठ चोथवे यांची जीवन विषयी माहिती..
आपल्या बालाजी आण्णांचा १५ मार्च १९५९ चा जन्म..
राजुर येथील रहिवासी असलेले स्वर्गवासी बालाजी (आण्णा) विष्णूशेठ चोथवे हे आपल्यातून जाऊन आज दहा दिवस पूर्ण झाले आहेत..
आज त्यांच्या दशक्रिया विधी निमित्त त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार त्यांना शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित आहेत..
बालाजी आण्णा हे जन्मापासून माळकरी होते.. त्यांच्या आईने श्री. ज्ञानेश्वर महाराज मोरे यांच्या हातून त्यांना वयाच्या सातव्या वर्षी माळ घातली होती.. पुढे जाऊन तेच ज्ञानेश्वर महाराज बालाजी आण्णांचे गुरू झाले.. बालाजी आण्णांनी वयाच्या सातव्या वर्षापासून पंढरपूर, आळंदी, पैठण, देहू, त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राची दिंडीत पायी वारी केली, जी त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवली होती. तसेच राजूर ते शनिशिंगणापूर ही दिंडी तेलाची कवाड पायी घेऊन जाण्याची सुरुवात राजुर येथून त्यांनी चालू केली. त्यांच्या या दिंडीचे शनिशिंगणापूर येथे खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले.. तेथील शनीमंदिर ट्रस्टच्या वतीने या दिंडीचा भव्य स्वागत करून त्यांना मानाचा फेटा, श्रीफळ, शाल देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या हातून शनि देवावर पूजाअर्चा करून तेलाचा अभिषेक केला जात असे.. तसेच त्यांनी जीवनात तेली समाज व इतर समाजात एकोपा ठेवण्याचं काम केले. तेली समाजाचे दैवत संत श्री. संताजी जगनाडे महाराजांची जयंती पुण्यतिथीची सुरवात सुरू करून राजूर गावात मोठ्या प्रमाणात समाज एकत्र करून गावात दिंडी मिरवणूक आणि भंडारा करायला सुरवात केली.. संत जगनाडे महाराजांची जयंती साजरी करण्याचे मोठे श्रेय यांना जाते.. पंचक्रोशीत कोणाच्याही कुठल्याही कार्यक्रमाला ते आवर्जून हजेरी लावायचे आणि त्या त्या प्रसंगाच्या अनुरूप, कुठल्याही पोथी – गाथेतला, तोंडपाठ असलेला कुठलाही अभंग, ओवी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवायचे.. गावात कोणाचाही मृत्यू झाला तर ते जातीने हजर राहू पूर्णविधी करेपर्यंत तेथेच हजर राहून योग्य ते मार्गदर्शन करत असायचे आणि त्याबरोबरच ओवी अभंग गात राहायचे..
ग्रामपंचायत सदस्य असलेले आई, वडील, पत्नी, भावजयी, पुतण्या ह्या मंडळीच्या मदतीने त्यांनी गावात केलेले समाजकार्य आज कोणीही नाकारू शकत नाही.
मवेशी, गोंदुशी, वांदुळशेत, कौठवाडी, माणिक-ओझर येथे दरवर्षी होत असलेल्या यात्रेत त्यांचा मानाचा फेटा ठरलेला असायचा..
ही आणि अश्या बऱ्याच आठवणी राजूरकरांच्या मनात सोडून ते आपल्यातून निघून गेले. अशा या महान, आदरणीय नेतृत्वाचे प्रत्येक माणसाशी प्रेमाचे संबंध होते. सर्व तेली समाज आणि इतर समाजही त्यांच्याकडे मोठ्या आशेने, आदराने आपल्याच घरातील एक सदस्य म्हणून पहायचा.
त्यांच्या पश्चात, त्यांच्या पत्नी, भाऊ, बहीण, दोन मुले, एक मुलगी, दोन पुतणे, दोन पुतण्या आणि नातवंडं यांना या दुःखात सावरण्याचं बळ मिळो..
अशा महान व्यक्तीमत्त्वाला सर्वांच्यावतीने अखेरची श्रद्धांजली अर्पण करतो..